पिंपरी : नोटबंदीनंतर महिलांचा रोजगारातील टक्का घसरण्यास सुरुवात झाली. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), कोविडसाठी पुकारलेल्या टाळेबंदीने रोजगार गळतीला वेग दिला. परिणामी चालू वर्षात १५ ते ४४ वयोगटातील ५२.४ टक्के महिलांनी रोजगार गमावला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी, इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने ‘वुमन ॲट वर्क’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद भरविली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास, आयआयटी दिल्लीतील मानववंशशास्त्र विभागाचे प्राध्यापक रवींद्र कौर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पीआयसीचे उपाध्यक्ष विजय केळकर, प्राध्यापक प्रदीप आपटे यांनी परिषदेचे संचालन केले.सीएमआयईने २०१९-२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या (६३.६८ टक्के) तुलनेत महिला रोजगाराचे प्रमाण ७.३४ टक्के आहे. ग्रामीण भागात पुरुष रोजगाराच्या (६८.१६ टक्के) तुलनेत महिला रोजगाराचे प्रमाण ९.७० टक्के राहिले.
शिकलेल्या महिलाही प्रवाहाबाहेर
रोजगारातील महिलांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. अगदी शिकलेल्या महिलादेखील रोजगार प्रवाहातून बाहेर पडत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्या घरीच राहणे पसंत करतात अथवा घरगुती व्यवसाय करताना दिसतात. कृषी क्षेत्रातील रोजगार कमी होत असल्याने महिलांचा रोजगारातील टक्का कमी होत असल्याचे कौर यांनी सांगितले.