मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी मोठा दणका दिला आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी ईडीला दिली.
हा कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर पहिल्यांदा या कायद्यांतर्गत आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी हा कायदा संमत करण्यात आला. नीरव मोदी याने पीएनबी बँकेकडे गहाण न ठेवलेली संपत्ती ताब्यात घेण्याची परवानगी ईडीला देण्यात आली. विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. सी. बर्डे यांनी ईडीला ही संपत्ती एका महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश दिले. ही संपत्ती केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात येईल. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते.