नवी दिल्ली - भारतात राष्ट्रीय महामार्गावर गाडीत इंधन आणि पोटात अन्न या गोष्टींसाठी लांबचा पल्ला गाठावा लागतो. मात्र, आता जेवणासाठी ढाब्याचा शोघ घ्याल तर, तुम्हाला इंधन स्टेशन म्हणजेच पेट्रोल पंपावर माहिती उपलब्ध होईल. केंद्रीय दळणवळणमंत्री मंत्रालयातील अधिकाऱ्यांना एका प्रस्तावावर काम करण्यास सांगितले. त्यानुसार, ढाबा मालकांनाच पेट्रोल पंप टाकण्यास परवानगी देण्यात येईल.
नितीन गडकरी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात या गोष्टींवर प्रकाश टाकला होता. ढाब्यांवर इंधन स्टेशन उभारल्यास अनेक फायदे होऊ शकतात. केवळ ढाबा मालकांनाच नाही, तर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही याचा फायदा होईल, असे गडकरींनी म्हटले होते. सध्या लोकं रस्त्याच्या कडंच्या जमिनीवर अतिक्रमण करून ढाबे उघडत आहेत. सकाळीच मी एमओआरटीएचच्या अधिकाऱ्यांशी बोललो, ज्याप्रमाणे एनएचएआई पेट्रोल पंपासाठी एनओसी देते, त्याचप्रमाणे आपणही लहानसहान ढाबा आणि हॉटेल मालकांना ढाब्याजवळ पेट्रोल पंप आणि शौचालय बनविण्याची परवानगी देण्यासंदर्भातही विचार केला पाहिजे, असे गडकरींनी म्हटलं होतं.
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर इंधन स्टेनशची निर्मित्ती करण्यासोबतच ढाबा मालकांच्या उत्पन्नात वाढ करण्याचंही काम या योजनेतून होईल. विशेष म्हणजे गडकरींनी इलेक्ट्रीक वाहनाच्या चार्जिंगसंदर्भात येथे भाष्य केलं नाही. त्यामुळे, आगामी काळात याचाही विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर निर्भर न राहणारा देश बनविणे आवश्यक आहे, असेही गडकरींनी म्हटलं होतं.