नवी दिल्ली : देशातील वैयक्तिक कर्जाचा (पर्सनल लोन) सरासरी आकार (तिकीट साईझ) २०१८ पासून सातत्याने घटत असून मागील तीन वर्षांत वैयक्तिक कर्जाचा सरासरी आकार १ लाख रुपयांनी घटून १८६,३३८ रुपयांवर आला आहे. २०१८ मध्ये तो २,८०,९७३ रुपये होता.
वैयक्तिक कर्जाच्या आकारातील सर्वाधिक घसरण ४५ ते ५८ या वयोगटात झाल्याचे दिसून आले आहे. या वयोगटातील लोकांनी २०१८ मध्ये सरासरी ३,७५,६६२ रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. यंदा ते ४८.५६ टक्क्यांची घसरून १,९३,२४० रुपयांवर आले. २५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटातील कर्ज आकारात सर्वांत कमी ३० टक्के घसरण झाली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, अलीकडे अकार्यरत भांडवलात (एनपीए) मोठी वाढ झाल्यामुळे बँकांनी कर्ज धोरण अधिक कडक केले आहे. त्यातच वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते. यात जोखीम अधिक असते. त्यामुळे या कर्जाचे नियम अधिक कडक झाले आहेत. त्याचा फटका बसून वैयक्तिक कर्जाचा आकार घटला आहे.
‘बीएनपीएल’मध्ये वाढ
‘बँक बाजार डॉट कॉम’चे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले की, देशात ‘बाय नाऊ, पे लॅटर’ (बीएनपीएल) तेजीने वाढत आहे. हे फिरत्या स्वरूपाचे कर्ज (रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट) आहे. त्याचा वारंवार वापर केला जाऊ शकतो. हे कर्ज घेणेही सोपे आहे. त्याचा फटका वैयक्तिक कर्जास बसला आहे.