atal pension scheme : काळ झपाट्याने बदल आहे. पूर्वीसारखं आपल्या मुलांवर म्हातारपणी विसंबून राहण्याचे दिवस आता गेले आहेत. निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी आतापासूनच तयारी करायला हवी. यासाठी योग्य योजना निवडणे खूप महत्त्वाचे आहे. भारत सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना (APY) हा एक चांगला पर्याय आहे. जी तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील लोकांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
या योजनेअंतर्गत १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदाराला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
कमी योगदानात जास्त फायदा
तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर दरमहा केवळ २१० रुपये योगदान देऊन, तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी ५,००० रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
सरकारी हमी
या योजनेत मिळणाऱ्या पेन्शनच्या किमान रकमेची हमी केंद्र सरकारकडून दिली जाते, ज्यामुळे तुमचे पेन्शन सुरक्षित राहते. केंद्र सरकार देखील तुमच्या योगदानाच्या रकमेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १ हजार प्रति वर्ष योगदान देते. यासाठी २ अटी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट असाल तर लाभ मिळणार नाही. आयकर भरणाऱ्यांनाही ही मदत मिळत नाही.
विविध पर्याय
तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी गुंतवणूक सुरू करायची असल्यास, तुम्हाला ६० वर्षांच्या वयानंतर ५,००० रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा १,४४५ रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही वयाच्या ३२व्या वर्षी या योजनेत सामील झाल्यास तुम्हाला दरमहा ६८९ रुपये योगदान द्यावे लागेल. योजनेमध्ये विविध पेन्शन पर्याय दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा आणि आर्थिक स्थितीनुसार योजना निवडू शकता.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणुकीचे फायदे
नियमित मासिक पेन्शनद्वारे वृद्धापकाळात आर्थिक स्वातंत्र्य मिळेल
विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी फायदेशीर.
लवकर गुंतवणूक केल्यास कमी योगदानासह अधिक फायदे मिळू शकतात.