नवी दिल्ली : मार्च २०२१ ते मार्च २०२२ या काळात व्यक्तिगत किरकोळ कर्जात उल्लेखनीय ४२ टक्के वृद्धी झाली आहे. आर्थिक आणि व्यावसायिक धारणेत सुधारणा झाल्याचे यातून दिसून येत आहे.
आकडे विश्लेषण आणि तंत्रज्ञान कंपनी ॲक्विफॅक्स तसेच कर्ज वितरणाशी संबंधित कंपनी अँड्रोमेडा यांनी संयुक्तपणे केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, मार्च २०२१ ते मार्च २०२२ या काळात सक्रिय व्यक्तिगत कर्जांची संख्या ६ कोटींवर पोहोचली. मार्च २०२० मध्ये ती ३.५ कोटी होती. मार्च २०२१ मध्ये एकूण व्यक्तिगत कर्ज आकार ६ लाख कोटी रुपये होता. मार्च २०२२ मध्ये तो वाढून ८ लाख कोटी रुपये झाला.
बँक घोटाळे रोखण्यासाठी ‘फ्रॉड रजिस्ट्री’ स्थापणारबँक घोटाळे रोखण्यासाठी ‘फ्रॉड रजिस्ट्री’ची (घोटाळा निबंधक) स्थापना करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) करीत आहे. ‘फ्रॉड रजिस्ट्री’च्या मदतीने घोटाळेबाज वेबसाइट्स, फोन नंबर आणि विभिन्न प्रकारचे डाटाबेस तयार केले जाणार आहेत. आरबीआयचे कार्यकारी संचालक अनिल कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.
खासगी बँका आघाडीवरॲक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा विभागीय प्रमुख (भारत व पश्चिम आशिया) के. एम. नानैया यांनी सांगितले की, ‘‘व्यक्तिगत कर्जातील वृद्धीतून देशात विक्री वाढत असल्याचे मजबूत संकेत मिळत आहेत.” अभ्यासानुसार, मार्च २०२२ मध्ये किरकोळ कर्जाची एकूण थकबाकी ८९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मार्च २०२१ मध्ये ती ८० लाख कोटी रुपये, तर मार्च २०२० मध्ये ७१ लाख कोटी रुपये होती. मार्च २०२० ते मार्च २०२२ या काळात सर्वाधिक ३२% वृद्धी खासगी बँकांनी नोंदवली. सरकारी बँकांची हिस्सेदारी २१ टक्के राहिली.