>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 10 - डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएमने क्रेडिट कार्डावरून पेटीएमवर पैसे टाकण्यावर २ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पेटीएमने घेतलेल्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर काही तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. ग्राहकहितासाठी निर्णय मागे घेण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण पेटीएमने दिलं आहे.
काय होता निर्णय -
डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएमने गुरुवारी निर्णय जाहीर करत क्रेडिट कार्डावरून पेटीएमवर पैसे टाकण्यावर २ टक्के शुल्क लावला. अनेक ग्राहक आपल्या क्रेडिट कार्डावरून पेटीएमवर पैसे वळते करायचे, त्याबदल्यात मोफत क्रेडिट मिळवून पैसे पुन्हा क्रेडिट कार्डवर घ्यायचे. ते टाळण्यासाठी पेटीएमने हे शुल्क लावले होते.
पेटीएमने काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं की, वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास क्रेडिट कार्डांचा वापर करणाऱ्यास ग्राहकास तेवढीच रक्कम कॅशबॅक म्हणून पेटीएम देणार आहे. नेटबँकिंग आणि डेबिट कार्डावरून वॉलेटवर पैसे टाकण्यावर मात्र कुठलेली शुल्क नाही. पेटीएमने म्हटले की, लोक जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करतात तेव्हा पेटीएमला शुल्क अदा करावे लागते. लोक आमच्या वॉलेटमध्ये पैसे टाकून पुन्हा परत घेत असतील, तर आम्हाला पैसे गमवावे लागतात. लोकांनी वॉलेट बॅलन्समधून सेवा आणि उत्पादने विकत घेण्यासाठी पैसा वापरला तरच पेटीएमला पैसे मिळतात.
मात्र पेटीएमचा हा निर्णय लोकांना अजबिात पटला नाही आणि त्यावर टीका सुरु झाली. त्यानंतर काही तासातच पेटीएमने हा निर्णय मागे घेतला. पेटीएमने निर्णय मागे घेतल्याने युजर्सला दिलासा मिळाला आहे.