ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर सातत्त्याने घटत असल्याने मंगळवारी भारतातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केली आहे. यानुसार पेट्रोलचे दर प्रति लीटरमागे २ रुपये ४२ पैसे तर डिझेलचे दर प्रति लीटरमागे २ रुपये १४ पैशांनी कमी झाले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या वर्षी जूनपासून कच्च्या तेलाच्या दरात लक्षणीय घट होत असून आत्तापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ६० टक्क्यांची कपात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात जाहीर झाली. पेट्रोलच्या दरात कपात करण्याची ही लागोपाठ दहावी वेळ असून डिझेलच्या दरात लागोपाठ सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे.