नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुका संपताच सरकारी मालकीची इंधन कंपनी ‘इंडियन आॅइल’ने पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारपाठोपाठ मंगळवारी सलग दुस-या दिवशीही मोठी वाढ केली. पेट्रोलचे दर प्रतिलीटर १५ पैशांनी, तर डिझेलचे दर प्रतिलीटर २३ पैशांनी वाढविले आहेत.कर्नाटक निवडणुकीच्या १९ दिवसांच्या काळात कंपनीने इंधन दरवाढ रोखली होती. निवडणूक संपताच सोमवारी पहिली दरवाढ करण्यात आली. त्यात पेट्रोलचे दर १७ पैशांनी, तर डिझेलचे दर २१ पैशांनी वाढविण्यात आले. लगेच मंगळवारी दुसरी दरवाढ करण्यात आली. निवडणुकांचा प्रचार सुरू असताना, लोकांवर ताण येऊ नये, म्हणून आम्ही दरवाढ करण्याचे टाळले आहे, असा न पटणारा खुलासा पेट्रोलियम सचिवांनी केला होता.इंडियन आॅइल कंपनीने २५ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरातील रोजचा आढावा थांबविला होता. हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनीही त्याचा कित्ता गिरविला होता. त्यामुळे या काळात इंधनदर जैसे थे होते.>दर आणखी भडकणारसूत्रांनी सांगितले की, २५ एप्रिल ते १४ मे या काळात पेट्रोल आणि डिझेलची प्रतिबॅरल किंमत, तसेच वाहतूक खर्च यात अनुक्रमे ४.१५ डॉलर व ३.९४ डॉलर वाढ झाली आहे. हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी कंपन्यांकडून इंधनाच्या दरात आणखी वाढ केली जाऊ शकते.
पेट्रोल-डिझेल महागले, सलग दुसऱ्या दिवशीही इंधनदरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:05 AM