Join us

इराण इम्पॅक्ट, भारतात पेट्रोल व डिझेलचे दर स्वस्त होणार ?

By admin | Published: July 14, 2015 4:57 PM

इराण व पाश्चिमात्य राष्ट्रांमधील अणुकराराचा फायदा भारताला होण्याची चिन्हे असून या करारामुळे भारतातील पेट्रोल व डिझेलचे दर घटण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - इराण व पाश्चिमात्य राष्ट्रांमधील अणुकराराचा फायदा भारताला होण्याची चिन्हे असून या करारामुळे भारतातील पेट्रोल व डिझेलचे दर घटण्याची चिन्हे आहेत. इराणवरील आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्यात मागे घेतले जाणार असून यामुळे इराणमधील कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला उपलब्ध होणार आहे. 

इराण व अमेरिकेसह पाच प्रमुख पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये मंगळवारी अणुकरार झाला असून या करारानुसार इराणवरील आर्थिक निर्बंध मागे घेतले जातील. याचा फायदा इराणमधील अर्थव्यवस्थेलाही होणार असून इराणमधील कच्च्या तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. या कराराचे वृत्त समजताच आंतरारष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये प्रति बॅरेलमागे एक डॉलर्सची घट झाली आहे. इराणचे तेलही बाजारात आल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीमध्ये आणखी घट होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींचा फायदा भारतालाही होणार असून भारतातील पेट्रोल व डिझेलचे दरही घटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

काय आहे हा करार ?

इराणमधील अणूकार्यक्रमात अण्वस्त्रांची निर्मिती होत असल्याचा दावा पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी केला होता व यानंतर इराणवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. तर इराणने नेहमीच या आरोपांचे खंडन केले होते. गेल्या काही महिन्यांपासून इराण व अमेरिका, जर्मनी, रशिया, फ्रान्स, ब्रिटन व चीन या पाश्चिमात्त्य राष्ट्रांमध्ये चर्चा सुरु होती. ही चर्चा आता फळास आली असून मंगळवारी इराण व पाश्चिमात्त्य राष्ट्रांमध्ये करार झाला. यानुसार इराणला अणूकार्यक्रम राबवणे शक्य असेल, संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम राबवण्याची प्रमुख अट आहे. यामुळे इराणच्या अणू कार्यक्रमावर जगभराची नजर आहे. इस्त्रायलने या अणुकराराचा तीव्र विरोध दर्शवला आहे.