नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ७0 डॉलरवर गेल्या आहेत. २0१४ नंतरचा हा सर्वोच्च दर ठरला आहे. भारत आणि चीन यांच्यासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांवर याचा जबर परिणाम होऊ शकतो. भारताच्या एकूण आयातीत तेलाचा वाटा तब्बल २८ टक्के आहे. २0१७-१८ मध्ये भारताने ७.५ लाख कोटी रुपयांची तेल आयात केली. भारताची आयातही वर्षागणिक वाढतच आहे. २0१३-१४ मध्ये ती ७७.३ टक्क्यांनी, तर २0१६-१७ मध्ये ८१.७ टक्क्यांनी वाढली होती. कच्चे तेल एक डॉलरने महागल्यास भारताच्या तेल आयातीचे बिल 0.५१ अब्ज डॉलरने वाढते.
पेट्रोल-डिझेल महागणार
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा सामान्य माणसाला थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून बसतो. मध्यंतरी कच्चे तेल स्वस्त झाले, तेव्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोलवरील कर ११.७७ रुपयांनी, तर डिझेलवरील कर १३.४७ रुपयांनी वाढविले. तेल महाग झाल्यावर मात्र एकदाच २ रुपयांची कपात केली. सध्या पेट्रोलवर ४८.२ टक्के, तर डिझेलवर ३८.९ टक्के कर आहे.
चीनचेही तसेच हाल
भारताप्रमाणेच चीन, तैवान, चिली, तुर्कस्तान, इजिप्त व युक्रेनलाही तेल दरवाढीचा फटका बसत आहे. चीन सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. त्यामुळे चीनमधील महागाई वाढू शकते.
रिझर्व्ह बँकेला चिंता
रुपया घसरत असल्यामुळे तेल आयातीवरील भारताचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक चिंतेत आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाऊ शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे.
अमेरिकेला झळ नाही
अमेरिकेने आपले शेल तेलाचे उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे अमेरिकेला कच्च्या तेलाच्या वाढीव दराचा कोणताही फटका बसत नाही. अर्थतज्ज्ञांच्या मते, पूर्वी कच्च्या तेलाच्या किमती १0 डॉलरने वाढल्यास अमेरिकेचा जीडीपी 0.३ टक्क्यांनी कमी होत होता. आता हे प्रमाण 0.१ टक्क्यांवर आले आहे.
तेल दरवाढीचा बसणार फटका, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ७0 डॉलरवर गेल्या आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:52 AM2018-05-12T03:52:32+5:302018-05-12T03:52:32+5:30