मुंबई :पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे ठेवले आहेत. सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर १०० रुपयांवर आहेत. (Petrol Diesel Price Today)
गेल्या काही सत्रांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत असून, तेलाचा भाव ६० डॉलरपर्यंत खाली आला होता. तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली होती. कोरोना संकटातून हळूहळू अनेक देश सावरत असल्यामुळे इंधनाची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. सुएझ कालव्याची कोंडी फुटल्यामुळे तूर्त विस्कळीत झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीची सुवर्ण संधी! एकाच महिन्यात ६ कंपन्यांचे IPO शेअर बाजारात येणार
मुंबई, दिल्लीतील आजचे इंधनदर
मुंबईत पेट्रोलचा दर ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून, डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर, पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या १० दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती तीन वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. ३० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले. पेट्रोल प्रति लीटर २२ पैशांनी आणि डिझेल २३ पैशांनी कमी झाले होते.