मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल ७० डॉलर झाल्याचे कारण पुढे करत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. पेट्रोल सरासरी ८० रुपये तर डिझेल ६६ रुपये प्रति लीटरवर गेल्याने महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ७९.१५ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६५.९० रुपये प्रति लीटर एवढा झाला आहे.
इंधनाच्या दरांवरील नियंत्रण काढल्यानंतर वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलले जात आहेत. मात्र प्रत्येक दिवशी दर वाढतच असून, मागील दोन महिन्यांत लीटरमागे तब्बल साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या डॉलर कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार कच्च्या तेलाकडे वळले आहेत. उत्पादन कमी व मागणी अधिक असल्याने काही दिवस तरी पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची चिन्हे नाहीत.
भाज्या आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्याने डिसेंबरचा महागाई दर ५.१ या एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेच्या ४.३ ते ४.७ टक्के या अंदाजापेक्षाही तो अधिक राहिला. आता पुन्हा इंधनाचा भडका उडाल्याने जानेवारीचा महागाई दर ७ टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती आहे.
यूपीएने सांभाळले होते दर
यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये आंतरराष्टÑीय बाजारात कच्चे तेल १३० डॉलर प्रति बॅरेलवर असताना पेट्रोल ८० रुपयांवर गेले होते. त्यावरून भाजपाने आकांडतांडव करून दरवाढीविरोधात देशभर आंदोलन केले होते.सध्या कच्चे तेल ७० डॉलर प्रति बॅरेल असताना पेट्रोल ८० रुपयांच्या घरात गेले आहे. कच्च्या तेलाने १०० डॉलरचा टप्पा पार केल्यास पेट्रोल शंभरी पार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कारणे : तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. यामुळे सोमवारी आंतरराष्टÑीय बाजारात कच्चे तेल ७० डॉलर प्रति बॅरेल (१५९ लीटर) वर गेले. भारतीय कच्च्या तेलाचा बाजार हा सिंगापूर निर्देशांकाशी संलग्न असतो. सिंगापुरात भाव ७६ डॉलरवर गेला आहे.
अशी झाली पेट्रोल दरवाढ
(लीटर रुपयांत)
जून : ७५.५०
(रोज बदलण्याचा निर्णय)
जुलै : ७३.२०
आॅगस्ट : ७५.५५
सप्टेंबर : ७८.८०
आॅक्टोबर : ७५.५०
नोव्हेंबर : ७६.२०
डिसेंबर : ७७.८०
जानेवारी : ७९.१५
पेट्रोल आणि डिझेलचा भडका; महागाईत वाढ , स्वस्त होण्याची चिन्हेच नाहीत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल ७० डॉलर झाल्याचे कारण पुढे करत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाट वाढ केली आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:17 AM2018-01-17T04:17:24+5:302018-01-17T04:17:36+5:30