पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा भडका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वच महानगरांमध्ये या दोन्ही इंधनांच्या किंमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीतही 35 पैशांनी वाढ केली. देशात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकले जात आहे, तर पोर्ट ब्लेअर येथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. (Petrol is the cheapest in Port Blair)
पोर्ट ब्लेअर येथे तब्बल 29.11 रुपयांनी पेट्रोल स्वस्त -
राजस्थानातील श्रीगंगानगरशी पेट्रोलच्या दरांची तुलना केल्यास, आज दिल्लीत 12.07 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. तर पोर्ट ब्लेअर येथे तब्बल 29.11 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. याच पद्धतीने, लखनौसंदर्भात बोलायचे झाल्यास, श्रीगंगानगरच्या तुलनेत येथे 15.05 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. तसेच, गुरुग्राममध्ये 14.41 रुपये, आग्र्यात 15.28 रुपये, तर पाटण्यात 8.82 रुपये प्रति लीटर पेट्रोल स्वस्त आहे.
प्रत्येक शहरात वेगवेगळा दर का? -
प्रत्येक शहरात पेट्रोलच्या दरात तफावत असण्याचे कारण टॅक्स हेच असते. खरे तर, वेगवेगळ्या राज्यांचा टॅक्स रेट वेगवेगळा असतो. याशिवाय, प्रत्येक शहरानुसार, तेथील महानगरपालिका, नगरपालिका यांचे कर आहेत, याला स्थानिक संस्थांचा कर असेही म्हणतात. याशिवाय, वाहतुकीमुळेही अनेक वेळा टॅक्स रेटही वेग-वेगळा असतो. जसे की, अशी बरीच ठिकाणं आहेत, जेथे रिफायनरीमधून तेल पोहोचवणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत तेथे पेट्रोलची किंमत अधिक असू शकते.