नवी दिल्ली : राजस्थानातपेट्रोलचा दर बुधवारी प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक झाला. मध्य प्रदेशातही शंभरी पार करायला अवघे १० पैसे बाकी आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही सलग नवव्या दिवशीची वाढ आहे.
सूत्रांनी सांगितले की, अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच १०० रुपयांच्या वर गेलेले आहे. नियमित पेट्रोल मात्र प्रथमच शंभरी पार गेले आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल बुधवारी १००.१३ रुपये लिटर, तर डिझेल ९२.१३ रुपये लिटर झाले. बुधवारच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.५४ रुपये लिटर, तर डिझेल ७९.९५ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९६ रुपये लिटर, तर डिझेल ८६.९८ रुपये लिटर झाले.
राजस्थान सरकारने गेल्याच महिन्यात व्हॅटमध्ये २ टक्क्यांची कपात केली आहे. तरीही तेथील व्हॅट अजून सर्वाधिक आहे. तेथे पेट्रोलवर ३६ टक्के व्हॅट आणि १.५ रुपये प्रतिलिटर रस्ता कर आहे. डिझेलवर व्हॅट २६ टक्के आणि रस्ता कर १.७५ रुपये प्रतिलिटर आहे. मागील सलग नऊ दिवसात पेट्रोल २.५९ रुपयांनी आणि डिझेल २.८२ रुपयांनी महागले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. कर कमी करून दरवाढीपासून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत आहेत. सरकारने मात्र करकपात करण्यास नकार दिला आहे. करकपातीचा कोणताही विचार नसल्याचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी गेल्या आठवड्यात संसदेत सांगितले होते.
पेट्रोलच्या विक्री किमतीतील ६० टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या करात जाते. डिझेलच्या विक्री किमतीत कराचा वाटा ५४ टक्के आहे.
देशात जीएसटी लागू झाला त्यावेळी पेट्रोलियम पदार्थ त्यामधून वगळण्यात आले. कारण, जीएसटी लागू केल्यास राज्यांना त्यावर अन्य उपकर लावता येणार नव्हते, त्यामुळे राज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत घटणार होता. मात्र, पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याची मागणी सातत्याने होत असूनही सरकारकडून त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे.
राजस्थानमध्ये सर्वाधिक कर
व्हॅटसारखे स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. राजस्थानात पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यामुळे तेथे पेट्रोल सर्वांत आधी १०० रुपयांच्या वर गेले.
मध्य प्रदेशातील अनुपूर येथे पेट्रोल ९९.९० रुपये लिटर आणि डिझेल ९०.३५ रुपये लिटर झाले. राजस्थानातील गंगानगरमध्ये ब्रँडेड पेट्रोल १०२.९१ रुपये लिटर, तर डिझेल ९५.७९ रुपये लिटर आहे. राजधानी दिल्लीत ब्रँडेड पेट्रोल ९२.३७ रुपये लिटर आणि डिझेल ८३.२४ रुपये लिटर आहे.