नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलचे दर दाेन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. आजही तेल कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्राेलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत.
मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्राेलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्राेलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पाेहाेचले आहेत. पाेर्ट ब्लेअरला एक लिटर पेट्राेलसाठी सर्वात कमी ७०.२३ रुपये एवढे दर आहेत. इंधन दरवाढीतून सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
लाॅकडाऊनच्या कालावधीत सरकारने पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले हाेते. त्यानंतर १ जूनपासून दरवाढीस सुरूवात केली हाेती. सरकारने २२ सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीला ब्रेक लावला हाेता. २० नाेव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली हाेती. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्राेलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत.
मुंबईत ४ ऑक्टाेबर २०१८ ला पेट्राेलचे दर ९१.३९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर हाेते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८० डाॅलर्स प्रतिबॅरल एवढे हाेते. आता ते ४८ डाॅलर्स इतके आहेत.
उत्पादन शुल्कात माेठी वाढ
केंद्र सरकारकडून सध्या पेट्राेलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जाताे. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येताे.