Petrol and Diesel Price: सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी इंधन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा विचार करत आहेत. डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत इंधन कंपन्यांचा नफा ७५००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो आणि हे पाहता कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात.
कंपन्यांचं हे पाऊल महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतं. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. सरकारी फ्युअल रिटेलर्सनं एप्रिल २०२२ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आता कंपन्यांनी किंमतीचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. अधिकार्यांनी सूचित केले आहे की तेल विपणन कंपन्यांना (OMCs) प्रति लिटर १० रुपये प्रॉफिट मार्जिन असू शकते, जो आता ग्राहकांना दिला जाऊ शकते.
कंपन्यांना जबरदस्त नफा
सूत्रांनी संकेत दिलेत की तीन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत नफा कमावला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात ४९१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार 'पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील हायर मार्केटिंग मार्जिनमुळे, ३ ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे आणि हा ट्रेंड तिसऱ्या तिमाहीत दिसून येईल. या कारणास्तव, कंपन्या या महिन्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी करण्याचा विचार करू शकतात.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (HPCL) जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५८२६.९६ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला. कच्च्या तेलाच्या कमी किमती आणि हायर ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (GRM) यामुळे नफ्यात ही वाढ दिसून आली. त्याच वेळी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (BPCL) सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत ८२४४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे.