Petrol Diesel Price Excise Duty: केंद्र सरकारने सोमवारी (७ एप्रिल) इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लीटर दोन रुपयांनी वाढले आहे. ८ एप्रिलपासून हे लागू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार का? असा प्रश्न सर्वांना पडला. यावर केंद्र सरकारने खुलासा करत दिलासा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सचिव धीरज शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. ८ एप्रिलपासून वाढीव उत्पादन शुल्क लागू होणार आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याने याचा परिणाम दरांवर होणार का? याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
उत्पादन शुल्कात वाढ करताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, वाढलेल्या उत्पादन शुल्काचा परिणाम ग्राहकांवरती होणार नाही. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी जास्त होत असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काचा भार हा तेल वितरण कंपन्यांवर पडणार आहे. पण, या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येऊ नये, असे सरकारने तेल वितरण कंपन्यांना सांगितले आहे. त्यामुळे प्रति लीटर दोन रुपयांच्या या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही.
पेट्रोल डिझेलवर आता किती उत्पादन शुल्क
नवीन उत्पादन शुल्क वाढीसह आता पेट्रोलवर प्रति लीटर १३ रुपये आकारले जाणार आहेत. तर डिझेलवर प्रति लीटर १० रुपये आकारले जाणार आहेत.