आज एकीकडे रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ न करून सामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आता इंधन कंपन्याही सामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. जवळपास १३ महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र त्यात आता कपात होऊ शकते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंधन कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू शकतात.
निरनिराळ्या जागतिक कारणांमुळे इंधन कंपन्यांचा झालेला तोटा जवळपास भरून निघाला आहे आणि कंपन्या यापूर्वीच्या स्थितीच्या जवळ पोहोचल्या आहेत. इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या तिमाहीच्या निकालानंतर याची पुष्टी झाली होती. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंधन कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या सकारात्मक परिणामानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे कंपन्यांना आता इंधनात अंडर रिकव्हरीचा सामना करावा लागणार नाही.
निर्णयाचा परिणाम नाहीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या म्हणजे ओपेकच्या (OPEC) सदस्यांपैकी एकानं कच्च्या तेलाचं उत्पादनात केलेल्या कपातीचा परिणाम पर्यायी बाजारपेठांमुळे जाणवणार नाही. गेल्या रविवारी, ओपेक प्लस देशांनी त्यांचे नियोजित कच्च्या तेलाच्या उत्पादन कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
कमतरता भासणार नाहीकच्च्या तेलाचा जगातील प्रमुख निर्यातदार सौदी अरेबिया पुढील महिन्यात जुलैपासून उत्पादन कमी करण्यावर काम करत आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे उत्पादकांना कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.