महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास एक वर्षाने का होईना पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी कंपन्यांना तशा सूचना केल्याचे समजते आहे.
पेट्रोल कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अखेरची दरकपात केली होती. यानंतर कच्चे तेल ७० डॉलरवर आले तरी देखील कंपन्यांनी आपले नुकसान भरून काढण्याकडेच लक्ष दिले होते. आता कंपन्या फायदा कमवू लागल्या असून पेट्रोलमागे ५ रुपये प्रति लीटर आणि डिझेलमध्ये १ रुपये प्रतिलीटर असा फायदा होऊ लागला आहे. पेट्रोलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कंपन्या नफ्यात आहेत, तर डिझेलचा फायदा आता सुरु झाला आहे.
यातच काही राज्यांत विधानसभा निवडणूक आहे, काही राज्यांत होणार आहेत. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूकही लागणार आहे. या साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत देशातील जनतेला दिलासा देण्याचा विचार केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. दर कमी करणे किंवा वाढविणे हे आपल्या हातात नसले असे जरी केंद्र सरकार सांगत असले तरी गेल्या ९-१० वर्षांची आकडेवारी पाहता निवडणुका आल्या की दर वाढण्याचे थांबविले जाते. निवडणुका झाल्या की पेट्रोलियम कंपन्या इंधनात दरवाढ करत होत्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती त्यांच्या सोयीनुसार आणि व्याप्तीनुसार बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र, घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे एका तेल कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. बुधवार आणि गुरुवारी क्रूडच्या किमती सुमारे दोन टक्क्यांनी घसरल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचली होती. ती आज ब्रेंट क्रूड $ 80.82 प्रति बॅरल आणि WTI $77.79 वर आले आहे.