Fuel Price: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दीर्घकाळ स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. मात्र, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय दरात होत असलेली कपात लक्षात घेता केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील अप्रत्याशित करामध्ये (Windfall Tax) कपात केली आहे. यासोबतच डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील शुल्कही कमी करण्यात आले आहे.
किंमतीबाबत सविस्तर माहिती
पाचव्या पंधरवड्याच्या आढाव्यात, सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर १३ हजार ३०० रूपये प्रति टन वरून १० हजार ५०० रुपये प्रति टन केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, डिझेलच्या निर्यातीवरील शुल्कदेखील आता १३.५ रुपये प्रति लीटरवरून १० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. तसेच विमान इंधनाच्या निर्यातीवरील शुल्क ९ रुपये प्रति लिटरवरून ५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. त्यामुळे अप्रत्याशित लाभ कर (Windfall Gain Tax) कमी करण्यात आला आहे.
अप्रत्याशित नफ्यावर कर
भारताने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत सप्टेंबरमध्ये प्रति बॅरल $92.67 होती. पण मागील महिन्यात हीच किंमत $97.40 प्रति बॅरल इतकी होती. भारताने प्रथम १ जुलै रोजी अप्रत्याशित नफा कर लागू केला. त्यावेळी भारत ऊर्जा कंपन्यांना अप्रत्याशित नफ्यावर कर लावणाऱ्या देशांमध्ये सामील झाला. मात्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या. याचा परिणाम तेल उत्पादक आणि रिफायनरीज या दोघांच्या नफ्यावर झाला होता. परिणामी आता केंद्राकडून हा निर्णय घेतला गेला आहे.