नवी दिल्ली - देशभरात विरोध होत असतानाच तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 27 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरात 23 पैसे प्रति लिटरची वाढ झाली. या बदलानंतर दिल्लीत पेट्रोल 96.12 रुपये प्रति लिटर तर डिझेल 86.98 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. (Petrol diesel price hike 12 june 2021 delhi mumbai kolkata chennai updates)
पेट्रोल डिझेलचे महत्वाच्या शहरांतील आजचे दर -
- दिल्लीत पेट्रोल 96.12 रुपये तर डिझेल 86.98 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 96.06 तर डिझेल 89.83 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 102.30 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 97.43 रुपये तर डिझेल 91.64 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 102.73 रुपये तर डिझेल 95.92 रुपये प्रति लिटर
- भोपाळमध्ये पेट्रोल 104.29 रुपये तर डिझेल 95.60 रुपये प्रति लिटर
- नोएडात पेट्रोल 93.46 रुपये तर डिझेल 87.46 रुपये प्रति लिटर
राजस्थानात डिझेलचं शतक -
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लडाखमध्ये आधीच पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे. यातच आता डिझेलच्या दरानेही राजस्थानात शंभरी गाठली आहे. राजस्थान हे देशातील असे पहिले राज्य आहे, जेथे पेट्रोल आणि डिझेलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 107 रुपये तर डिझेल 100.05 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने सामान्य नागरिक त्रस्त -
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "जेव्हा देश आपत्तीत होता, लोक आर्थिक संकटाचा सामना करत होते. तेव्हा सरकारने पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावत 2.5 लाख कोटी रुपये कमावले."