Petrol Diesel Price Hike : इंधन कंपन्यांकडून सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. पेट्रोलच्या दरानं यापूर्वीच काही राज्यांमध्ये १०० रूपयांचा टप्पा पार केला होता. परंतु आता राजस्थानमध्येडिझेलचे दरही १०० रूपयांच्यावर गेले आहेत. शुक्रवारीदेखील इंधन कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली. ४ मे नंतर तब्बल २२ वेळा इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. त्या ठिकाणी पेट्रोलचे दर १०६.९४ रूपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ९९.८० रूपयांवर देले आहे. हा देशातील पहिला जिल्हा आहे, ज्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच पेट्रोलचे दर १०० रूपयांवर गेले होते. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार या ठिकाणी उत्तम गुणवत्तेच्या पेट्रोलची किंमत ११०.२२ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर १०३.४७ रुपये प्रति लिटर इतके पोहोचली आहेत. राजस्थानात देशातील राज्यांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधित वॅटही आकारला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा क्रमांक येतो.
राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या किरकोळ विक्रीचे दर १०० रूपये प्रति लिटरच्या वर पोहोचले आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या दरानं आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून त्या ठिकाणीही पेट्रोलचे दर आता ९५.८५ रूपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर हे ८६.७५ रूपयांवर पोहोचले आहे. स्थानिक कर आणि वॅटचे दर निरनिराळे असल्यानं राज्यांमध्ये इंधनाचे दरही निराळे आहेत.