चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपासून इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. चार महिन्यांपूर्वी दिवसाला २५-३० पैशांनी वाढणारे दर आज ८५ पैशांनी वाढू लागले आहेत. हे पाहिल्यास पुढील चार दिवसांत डिझेल शतक ठोकणार आहे.
आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात ८४ तर डिझेलच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली. मुंबईत हे दर पेट्रोल 111.67 आणि डिझेल 95.85 झाले आहेत. तर सिंधुदुर्गात पेट्रोल 113.37 आणि डिझेल 96.04 रुपये झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोल 97.01 रुपये आणि डिझेल 88.27 रुपये प्रति लीटर आहे.
नोव्हेंबर २०२१ पूर्वी दर दिवसाला 35-35 पैसे असे करत जवळपास 30 ते 35 रुपयांनी इंधन वाढले होते. मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली होती. कपातीपूर्वी हे दर पेट्रोल 117.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 106.55 रुपयांवर गेले होते. साठ-पासष्ठ रुपयांवर असलेले डिझेल आणि ७५-८० वर असलेले पेट्रोल पाहता पाहता शंभरी पार गेले होते. यानंतर दिवाळीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकांसाठी सरकारने दर थेट उतरविले होते, गेले चार महिने हे दर स्थिर ठेवण्यात आले होते जे आता पुन्हा वाढू लागले आहेत.