नवी दिल्ली :
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींनी देशात उच्चांक गाठल्याने वाहन खरेदीदारांनी आपला मोर्चा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये, देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किरकोळ विक्रीने चार लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. ईव्ही विक्रीत दुचाकी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (फाडा) ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एकूण किरकोळ विक्री तिपटीने वाढून ४,२९,२१७ युनिट्सवर गेली आहे. ती अगोदर १,३४,८२१ युनिट्स होती.
फाडाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये देशात १,६८,३०० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. गेल्या आर्थिक वर्षात, इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री २०२०-२१ च्या ४,९८४ युनिट्सच्या तुलनेत १७,८०२ युनिट्सवर पोहोचली आहे. ही वाढ तीन पट आहे. या विक्रीत देशातील
वाहन कंपनी टाटा मोटर्स १५,१९८ युनिट्सच्या किरकोळ विक्रीसह आघाडीवर आहे. तिचा बाजार हिस्सा ८५.३७ टक्के राहिली आहे.
एमजी मोटर इंडिया २,०४५ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिचा बाजारातील हिस्सा ११,४९ टक्के आहे. २०२०-२१ मध्ये एमजी मोटरची विक्री १,११५ युनिट्स होती. महिंद्रा अँड महिंद्रा १५६ युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या आणि ह्युंदाई मोटर १२८ युनिटच्या विक्रीसह चौथ्या स्थानावर आहे. दोघांचा बाजारातील हिस्सा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे.