देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. तर दुसरीकडे डिझेलचे दरही सातत्यानं वाढत आहे. शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. यामुळे जनतेच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढीवरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करून ग्राहकांना योग्य दरात इंधन उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३९ पैशांती वाढ झाली. त्यानंत दिल्लीतील पेट्रोलचे दर ९०.५८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचेही दर ३७ पैशांनी वाढून ८०.९७ रूपयांवर पोहोचले आहेत. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे काँग्रेसनंही कंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं.
#WATCH: Finance Minister Nirmala Sitharaman speaks on fuel price hike, "It's a vexatious issue in which no answer except for fall in fuel price will convince anyone. Both Centre & State should talk to bring down retail fuel price at a reasonable level for consumers..." pic.twitter.com/28LGWNye7I
— ANI (@ANI) February 20, 2021
महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते
"महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. सामान्य जनता गाडी घेऊन नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झालेली नाही," असा दावा बिहारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांनी ळी बोलताना केला. "महागाई वाढल्यामुळे बजेटवर काहीसा परिणाम जाणवतो. मात्र, हळूहळू सामान्य जनतेला याची सवय होते. महागाईला विरोध सामान्य जनता करत नसून, नेतेमंडळी करत आहेत," असा आरोपही त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले
फेब्रुवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर प्रति बॅरल ६५.०९ प्रति बॅरल होते. एप्रिल २०२० मध्ये कोरोना संकटामुळे तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली. तेलाचे दर १९ बॅरलपर्यंत कोसळले. मात्र आता जगातील अनेक देशांमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. तेलाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या दरांत वाढ होत आहे.
भारतात पेट्रोल, डिझेलच्या वाढ होण्यामागचं प्रमुख कारण काय?
खरंतर पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डीलरचं कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारं उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. दिल्लीत पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतकं आहे.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून इंधन दरात किती बदल?
नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१.१४ रुपये प्रति लिटर होता. तर डिझेलसाठी ५६.७१ रुपये मोजावे लागत होते. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलच्या दरात २६ टक्के, तर डिझेलच्या दरात ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात एका बॅरलचा दर ११० अमेरिकन डॉलर होता. आज एका बॅरलसाठी ६५ अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत.