आगामी काळात देशाला महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढतच चालले आहेत. उद्या शनिवारी सकाळी जेव्हा आपण डोळे उघडाल, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांची वाढलेले असणार आहेत. शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार असल्याचे वृत्त आहे.
22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत 7.20 रुपयांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शतक पार केले आहे. दिल्लीत शनिवारी सकाळपासून पेट्रोल 102.61 रुपये तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर आज 100 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. दुसरीकडे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले आहे. जगभरात आर्थिक निर्बंधांना सामोरे जाणाऱ्या रशियानेही भारताला मोठ्या सवलतीच्या दरात कच्चे तेल दिले आहे. मात्र, असे असतानाही भारतात तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत. तेलाच्या वाढत्या किमतीचा संबंध दैनंदीन गरजेच्या वस्तूंवरही होत असतो, यामुळे आगामी काळात आणखी महागाई वाढण्याची शक्यता आहे.