अमेरिकेने भारताला मोठा डिस्काऊंट देण्याचे सांगून चुचकारले असले तरी देशातील सर्वात मोठी इंधन कंपनी इंडियन ऑईलने रशियाचेच कच्चे तेल खरेदी केले आहे. रशियाने मोठ्या डिस्काऊंटवर भारताला कच्चे तेल देऊ केले आहे. यामुळे याचा फायदा थेट ग्राहकांना पोहोचविला जाणार की भारतात पेट्रोल, डिझेलचे दर चढेच राहणार हे समजणार आहे.
आयओसीएलने बुधवारी रशियाचे आणि आफ्रिकेचे असे सुमारे पन्नास लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. इंडियन ऑईलने रशियाचे ३० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. तर वेस्ट ऑफ्रिकेचे 20 लाख बॅरल तेल खरेदी केले आहे. कंपनीने ‘Vitol' नावाच्या ट्रेडरकडून रशियन तेल मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी केले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर इंडियन ऑईलने दुसऱ्यांदा रशियाच्या तेलाची खरेदी केली आहे. यानंतर काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियमने देखील रशियाचे कच्चे तेल खरेदी केले होते. या तेलाची डिलिव्हरी मे महिन्यात होणार आहे. यामुळे सध्यातरी पेट्रोल, डिझेलचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आज कंपन्यांनी दर जैसे थेच ठेवले आहेत.
रशियाने नाटो देशांना आपल्याकडून कच्चे तेल, गॅस खरेदी करायचा असेल तर डॉलरमध्ये नाही तर रुबलमध्ये व्यवहार करण्याचे आदेश दिले आहेत. युरोपियन देश मोठ्या प्रमाणावर रशियन कच्च्या तेलाचे आणि गॅसचे आयातदार आहेत. त्यांची मागणी अमेरिका पूर्ण करू शकत नाही. यामुळे या देशांना रशियावरच अवलंबून रहावे लागणार आहे. रशियावर निर्बंध लादल्याने इंधनाचे दर वाढले होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी अमेरिकेने अरब राष्ट्रांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले होते. यामुळे अरब राष्ट्रांचे तेल बाजारात येऊ लागल्याने बॅरलचे दर काहीसे स्थिरावले आहेत.