गेल्या १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ आज झालीच नाही. आज एक एप्रिल असल्याने एप्रिल फूल बनविण्याचा दिवस असतो. सारे एकमेकांना फूल बनविण्याचा प्रयत्न करतात. परंतू इथे इंधन दरवाढीने फूल बनवत काहीसा दिलासा दिला आहे.
महिन्याचा पहिला दिवस असल्याने इंधन दर, गॅस सिलिंडर आदींच्या किंमतींच्या कमी-अधिक होण्याचा दिवस असतो. कंपन्यांनी याच दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर न वाढविल्याने पुढील महिन्यात दर कमी होणार की आणखी वाढत जाणार हे कळेनासे झाले आहे. दुसरीकडे कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईत आज कालच्या एवढेच पेट्रोल, डिझेलचे दर आहेत. पेट्रोल प्रति लीटर 116.72 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 100.94 रुपये एवढे आहे. तर पुण्यात पेट्रोल 116.38 प्रती लीटर आणि डिझेल 99.12 रुपये प्रती लीटर आहे. पुण्यात १२ पैशांनी डिझेलच्या दरात घसरण झाली आहे.
सरकारने कमावले ३.३१ लाख कोटी
केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार, ऑईल डेपोपासूनच्या अंतरानुसार त्यांच्या किमती बदलतात.