Petrol Diesel Price May Cut Soon: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2-3 रुपयांची कपात होणार असल्याची चर्चा सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास शक्यता आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने गुरुवारी ही माहिती दिली.
रिपोर्ट्सनुसार, 5 ऑक्टोबरनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. ICRA च्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील विपणन मार्जिन भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी (OMCs) सुधारले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे, असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.
एजन्सीच्या मते, भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी US $ 74 प्रति बॅरल होती, जी मार्चमध्ये US $ 83-84 प्रति बॅरल होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
ICRA चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि गट प्रमुख गिरीश कुमार कदम म्हणाले, ICRA चा अंदाज आहे की, सप्टेंबर 2024 मध्ये (सप्टेंबर 17 पर्यंत) आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किमतींच्या तुलनेत OMC ची निव्वळ प्राप्ती पेट्रोलसाठी प्रति लिटर 15 रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर 12 रुपये असेल. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या, तर लिटरमागे दोन ते तीन रुपयांनी कपात करण्यास वाव आहे.