Join us  

Petrol Diesel Price: इंधन दरवाढीचे संकट: आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पेट्रोलियम कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 8:20 AM

Petrol Diesel Price: गेल्या सुमारे १२३ दिवसांपासून इंधन दर स्थिर असून, सर्वांत स्वस्त पेट्रोल-डिझेल कुठे मिळते? पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे (ब्रेंट क्रूड) दर प्रति बॅरल ११४ डॉलरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळे लवकरच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रतिलिटर मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचे बॉम्ब कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्या इंधनदरात नेमक्या किती रुपयांची वाढ करतात, या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

गेल्या सुमारे १२३ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. १० मार्च रोजी देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल २५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने महसूल कमी होत असल्याने सरकारकडे पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे. 

मुंबई, दिल्लीत पेट्रोलचा दर काय?

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०९.९८ रुपयांवर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०१.४० रुपये आहे. कोलकाता येथे एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वांत कमी दरात पेट्रोल आणि डिझेल लखनऊ शहरात मिळत असून, एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे.

सर्वांत स्वस्त डिझेल कुठे मिळते?

मुंबईत डिझेलचा दर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम असून, चेन्नईत डिझेल ९१.४३ रुपये आहे. कोलकाता येथे डिझेलचा दर ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. लखनऊ एक लीटर डिझेल दर ८६.८० रुपये आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपुष्टात येणार असून, देशवासीयांना आतापासूनच वाहन्यांच्या टाक्या फुल करून घ्याव्यात, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली होती. कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ११४.२३ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात ३ टक्के वाढ झाली. अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे अमेरिकेतील तेल साठा कमी होत आहे. विशेषत युरोपात मागील आठवडाभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलइंधन दरवाढ