नवी दिल्ली: गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनदरात (Petrol Diesel Price Today) आता पुन्हा एकदा सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, सहाव्या दिवसातील ही पाचवी दरवाढ आहे.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर ५० पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ५५ पैशांनी महागले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून, पेट्रोलियम कंपन्या त्याचा भार ग्राहकांवर टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे इंधन दरांत सातत्याने वाढ केली जात आहे.
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११३.८८ रुपयांवर गेला आहे. तर, दिल्लीत पेट्रोल ९९.११ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोलचा दर १०८.५३ रुपयांवर आहे. चेन्नईत पेट्रोल १०४.९० रुपये आहे. दुसरीकडे मुंबईत एक लीटर डिझेलचा ९८.१३ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ९०.४२ रुपयांवर आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९५ रुपये इतका झाला. कोलकात्यात डिझेल दर ९३.५७ रुपयांवर आहे. पेट्रोलनंतर आता डिझेल दरही लवकरच शतक गाठू शकतो, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्च, २३ मार्च, २५ मार्च आणि २६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास साडेचार महिने स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर सलग तीन वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली. चार वेळा किंमती वाढवल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर एकूण ३.२० रुपयांनी महागले आहे.