Join us  

Petrol Diesel Price Hike Today: इंधन दरवाढीची साडेसाती सुरुच! सलग ७ व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; पाहा, नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:26 AM

Petrol Diesel Price Hike Today: राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली असून, आर्थिक राजधानी मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनदरात (Petrol Diesel Price Today) आता पुन्हा एकदा सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाच्या भावात घसरण झालेली असतानाही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, आठवडाभरातील ही सातवी दरवाढ आहे. 

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग ६ दिवस दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सातव्याही दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल ७० पैसे प्रति लीटर महागले आहे. एका आठवड्यात किमतीत ४ रुपयांनी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ कच्च्या तेलाच्या बाजाराला बसली असून उत्पादन आणि पुरवठा यावर मोठा परिणाम झाला आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.०४ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलने शतक गाठले असून, आता लीटरमागे १००.२१ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०९.६८ रुपये असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव १०५.९४ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.

प्रमुख शहरांमधील डिझेलचे नवे दर 

मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९९.२५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९१.४७ रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९६ रुपये इतका असून, कोलकात्यात डिझेलचा भाव ९४.६२ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.

दरम्यान, निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १३७ दिवस स्थिर ठेवल्यानंतर २२ मार्चपासून इंधन दरात वाढ करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक दरात तब्बल २५ रुपयांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर दिल्लीत घाऊक बाजारात डिझेलचा भाव ११५ रुपये प्रती लीटर झाला. मुंबईत तो १२२ रुपये इतका वाढला होता. त्याशिवाय कंपन्यांनी हवाई इंधनाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवले होते. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल