नवी दिल्ली: गेल्या सलग दिवसांपासून इंधनदरात (Petrol Diesel Price Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, बारा दिवसातील ही दहावी दरवाढ आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी एक दिवस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरात पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ८५ पैशांनी महागले. पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरम्यान पेट्रोल आणि डिझेल ७ रुपये २० पैशांनी महागले आहे.
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबईत पेट्रोल ८५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११७.५७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.६१ रुपये झाला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११२.१९ रुपये इतका वाढला असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव १०८.२१ रुपये इतका झाला आहे. मुंबईत डिझेल दरांनी शंभरी ओलांडली आहे. एक लीटर डिझेलचा १०१.७९ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९३.८७ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९८.२८ रुपये इतका झाला असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९७.२० रुपये झाला आहे.
दरम्यान, दिल्लीत सीएनजी गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजी गॅस प्रती किलो ८० पैशांनी महागला आहे. तर घरगुती वापराच्या पाईप गॅसच्या दरात ५ रुपये प्रती क्युबिक मीटर वाढ करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. मागील दोन सत्रात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. दरम्यान, तीन आठवड्यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव १४० डॉलरपर्यंत वाढला होता.