गेल्या तीन आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचितही बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने अबकारी कर कमी केल्यानंतर जो काही बदल झाला ते तसाच आहे. असे असताना जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. हा दर १० वर्षांपूर्वीच्या सर्वाधिक किंमतीएवढा झाला आहे. यामुळे येत्या काळात कंपन्यांवर दबाव येऊन इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 121.28 प्रति बॅरल एवढी झाली आहे. हा दर २०१२ मध्ये होता. २१ मे रोजी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला होता. यानंतर देशातील किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते, तेव्हा केंद्राने त्याचा फायदा सामान्यांना दिला नव्हता. तेव्हा केंद्राने अबकारी करात वाढ करून दर जैसे थेच ठेवले होते. परंतू आता कच्च्या तेलाचे दर वाढू लागल्याने केंद्राने गेल्या सहा महिन्यांच्या अंतराने दोनदा या वाढीव अबकारी करात कपात केली आहे.
इंधनाचे दर चढे असूनही पेट्रोलिअम कंपन्यांना तोटा होत आहेत. आता पुन्हा कच्च्या तेलाचे दर वाढले तर त्याचा परिणाम या कंपन्यांच्या फायद्यावर होणार आहे. यामुळे या कंपन्या पुन्हा केंद्राकडे इंधनाच्या दरात वाढ करण्याची विनंती करू शकतात. गेल्या काही वर्षांपासून जरी केंद्राने दरात बदल करण्याचे आपल्याकडे नसले असे सांगितले असले तरी अनेकदा केंद्राच्या इशाऱ्यावरच या कंपन्या दर कमी जास्त करत असतात हे वेळोवेळी दिसून आले आहे. यामुळे जर कंपन्यांवर दबाव वाढला तर पुन्हा एकदा दरात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.
पेट्रोल डिझेलचा आजचा दर...आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात काहीही बदल झालेला नाही. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक दर आहेत. दिल्ली- पेट्रोल 96.72, डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर.मुंबई - पेट्रोल 111.35, डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर.चेन्नई - पेट्रोल 102.63, डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर.कोलकाता - पेट्रोल 106.03, डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर.