पेट्रोल, डिझेलच्या किंमतींना आता हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. देशाने कधी पाहिले नाहीत एवढे दर वाढू लागले आहेत. अशावेळी कुठे पैसे वाचवायचे आणि कुठे नाही असे आता लोकांना झाले आहे. इलेक्ट्रीक गाड्यांचे पर्याय महागडे आहेत, तर आपली पेट्रोल, डिझेलवरील गाडी विकली तरी ती नुकसानीत विकावी लागणार आहे. यामुळे थोडे स्मार्ट झाले तर याच दरवाढीमध्ये फायदा करून घेता येऊ शकेल.
आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर हा 119.67 रुपये आणि डिझेलचा दर हा 103.07 रुपये प्रति लीटर झाले आहे. गेल्या १५ दिवसांत हे दर १३ वेळा वाढले आहेत. 84, 84, 84, 84, 52, 33, 84, 84, 84, 84, 84, 43 आणि 84 असे जवळपास १० रुपयांनी वाढले आहेत. हा दरवाढीचा वेग पाहता आणि इंधन कंपन्यांचे नुकसान पाहता आणखी १० ते १२ रुपयांनी हे दर वाढण्याची शक्यता आहे.
दर वाढायला सुरुवात होताच ज्यांनी कारच्या टाक्या फुल केल्या आहेत, त्यांनी गेल्या १० दिवसांचे तरी पैसे वाचविले आहेत. आज अनेकजण ३०० ते ४०० रुपये फायद्यात आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. तज्ज्ञांनी व्यक्त केलेले वाढणाऱ्या दराचे अंदाज पाहता तुम्ही आणखी ३००- ४०० रुपये वाचवू शकणार आहात. आधीच्यांचा विचार केला तर त्यांनी तोवर ७०० ते ८०० रुपये वाचविलेले असतील. टाकी फुल करण्यासाठी ३० ते ३५ लीटर इंधन लागेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सोमवारी मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ब्रेंट क्रूड 3.12 डॉलरने वाढत 107.52 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 4.03 वाढत $ 103.30 वर पोहोचले आहे.
इंधन दर कमी झाले तर... इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. ते आणखी वाढतील असे स्पष्ट दिसत आहे. परंतू केंद्र किंवा राज्य सरकार हे दर कमी करेल असे अनेकांना वाटू लागले आहे. जीएसटीची विक्रमी वसुलीमुळे केंद्र कर कमी करेल असे म्हटले जात आहे. परंतू महाराष्ट्रात दिवाळीला तुम्ही अनुभव घेतला आहे. केंद्रात वेगळे सरकार आणि राज्यात वेगळ्या पक्षांचे सरकार असल्याने फक्त केंद्रानेच कमी केलेल्या दरांचा फायदा झाला. राज्य सरकारने दर कमी करण्यास सपशेल नकार दिला होता. यामुळेच राज्यात पेट्रोल, डिझेल इतरांच्या तुलनेत महाग होते. यामुळे केंद्राने जरी दर कमी केले तरी ते मागच्यावेळी कमी केल्याने आणखी जास्त कमी करण्याची शक्यता कमी आहे. आणि राज्याकडून तर अपेक्षाच सोडलेली बरी. यामुळे निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. जर दर कमी नाहीच झाले तर फायदा तुमचा होईल आणि जर कमी झाले तर नुकसान तुम्हाला होणार आहे. परंतू जर वाढत्या दरांचा विचार केला तर फायदाही मोठा आहे. हे वाचलेले पैसे तुम्ही इतर घरातील खरेदीसाठी वापरू शकणार आहात.