Join us

Petrol Diesel Price: १० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 8:10 AM

गेल्या ११९ दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर १० मार्चला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रशिया - युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे (ब्रेंट क्रूड) दर प्रति बॅरल १११ डॉलरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. हे दर २०१३ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले असून, यामुळे लवकरच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २५ रुपयांनी वाढ होऊन ते १३५ रुपये प्रति लिटरने मिळण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांनंतर दरवाढीचे बॉम्ब कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

सध्या कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जपान, अमेरिकेसह अन्य प्रमुख ३१ देशांनी तब्बल ६ कोटी बॅरल तेल बाजारात ओतण्याचा निर्णय घेतला. मात्र ते गरजेपेक्षा अतिशय कमी असल्याने येत्या काही दिवसांत कच्चे तेल आणखी महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनेही जगाला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे. 

- देशात पाच राज्यांत निवडणुका असल्याने गेल्या ११९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

- या ११९ दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर मात्र ८० डॉलरवरून ११२ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत.

- निवडणुकानंतर म्हणजेच १० मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता आहे.

१५० डॉलरवर जाणार?

- गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनल आणि जेपी मॉर्गन या जागतिक कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किमती लवकरच प्रति बॅरल १५० डॉलरच्या पुढे जाऊ शकतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरवाढीचे कारण काय?

रशियाने क्रूडच्या किमतीत विक्रमी घट केली असली तरीही अमेरिका आणि युरोपने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे तेल कोणालाही खरेदी करता येत नाही. यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे.

सरकार काय करू शकते?

कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने सरकारचा महसूल कमी होतोय. त्यामुळे सरकारकडे पेट्रोल- डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेलकेंद्र सरकार