Join us  

Petrol Diesel Prices : भडका उडणार! 150 रुपयांपर्यंत जाणार पेट्रोलचा भाव! डिझेलही मोठ्या प्रमाणावर महागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:04 PM

अहवालात म्हणण्यात आले आहे, की असे झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डिझेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिझेलही 140 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर अनेक शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढीचा हा ट्रेंड कायम राहणार आहे.

का वर्तवली जातेय शक्यता? -खरे तर, मार्केट स्टडी आणि क्रेडिट रेटिंग कंपनी गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार, पुढच्या वर्षी ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरपर्यंत पोहोचतील. हे सध्याच्या 85 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे. एवढेच नाही तर, कच्च्या तेलाची किंमतही प्रति बॅरल 147 डॉलर या सर्वकालीन उच्च पातळीला स्पर्श करू शकते, असा अंदाज आहे.

कच्च्या तेलाच्या किमतींचा हा स्तर 2008 साली होती. तेव्हा जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण होते. अहवालात म्हणण्यात आले आहे, की असे झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डिझेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिझेलही 140 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, गोल्डमॅन सॅक्सचा हा अंदाज पुढील वर्षासाठी आहे.

दिलासा मिळण्याची शक्यता कमीच - पेट्रोल आणि डिझेलसंदर्भात सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, केंद्र सरकार करात कपात करून आपला महसूल कमी करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अशा स्थितीत त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडू शकतो.

सातत्याने होतेय इंधन दरवाढ -  देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35-35 पैशांनी वाढ झाली. राजधानी दिल्लीत पेट्रोल 108.29 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लीटर या सर्वकालीन विक्रमी पातळीवर विकले जात आहे. या महिन्यात आतापर्यंत 28 दिवसांपैकी 21 दिवस तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल 6.65 रुपयांनी तर डिझेल 7.25 रुपयांनी महागले आहे. जुलैमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने १०० रुपयांची पातळी ओलांडली होती.

टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेल