पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ होत आहे. मिळालेल्या माहिती नुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ होणार आहे. वाढलेले दर उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.
दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर -पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत भलेही 137 दिवसांपासून वाढ झालेली नसेल, पण ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात अचानकपणे थेट 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. या निर्णयापासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार, असा कयास लावला जात होता.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ -पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे कच्च्या तेलाची दरवाढ. पेट्रोल आणि डिझेलचा सध्याचा दर हा, जेव्हा कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळपास होते, तेव्हाचा आहे. आता कच्च्या तेलाचे दर घसरले असतानाही प्रति बॅरल 100 डॉलर आहे. यामुळेही, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याचा कयास लावला जात होता.