Join us

वर्षभरात 63 वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; सरकारची बम्पर कमाई पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 9:20 AM

केंद्र सरकारला पेट्रोलियम पदार्थ, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्युटीतून होणाऱ्या कमाईशी संबंधित आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरीही ओलांडली आहे. मात्र, सोमवारी देशाच्या संसदेत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांसंदर्भात सरकारने काही असे तथ्य समोर ठेवले, जे जाणून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. देशात 2021 मध्ये तब्बल 63 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. (Petrol diesel prices increased 63 times this year the government earned rs 3.34 lakh crore)

वर्षभरात 63 वेळा वाढले पेट्रोलचे दर -लोकसभेत पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरात यावर्षी आतापर्यंत तब्बल 63 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तर केवळ 4 वेळा यांचे दर कमी झाले आहेत. हा सरकारी आकडा 1 जानेवारी ते 9 जुलैपर्यंतचा आहे. तसेच पेट्रोलसंदर्भात बोलायचे झाल्यास 123 दिवस असे होते, ज्या दिवशी पेट्रोलच्या दरात काहीही बदल झाला नाही.

पुढील महिन्यापासून स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय...!

डिझेलचे दर 61 वेळा वाढले -या वर्षी डिझेलचे दर 61 वेळा वाढले आहेत. तर चार वेळा डिझेलचे दर कमी झाले आहेत. तसेच 125 दिवस हे दर जैसेथे होते. गेल्या तीन वर्षांचा विचार करता 2018-19 दरम्यान पेट्रोलच्या दरात 148 वेळा, 2019- 20 मध्ये 89 वेळा, तर 2020-21 मध्ये 76 वेळा वाढ झाली, तर डिझेलच्या दरात 2018-19 मध्ये 140 वेळा, 2019-20 मध्ये 79 वेळा तर 2020-21 मध्ये 73 वेळा वाढ झाली.

एक्साइज ड्यूटीतून सरकारची बम्पर कमाई -केंद्र सरकारला पेट्रोलियम पदार्थ, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्युटीतून होणाऱ्या कमाईशी संबंधित आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे.  गेल्या तीन वर्षांचा विचार करता वर्ष 2020-21 मध्ये सरकारच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये एक्साइज ड्यूटीतून सरकारला 235301 कोटी रुपयांची कमाई झाली होती. यात जवळपास 213000 कोटी रुपये केवळ पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या टॅक्समधून आले होते. 2019-20 मध्ये 197845 कोटी रुपयांची कमाई झाली. 2020-21 मध्ये सरकारच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली आणि ती वाढून 344746 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. यात जवळपास 334000 कोटी रुपये पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्यूटीतून आले आहेत.

टॅग्स :पेट्रोलडिझेलसंसदसंसेदेचे पावसाळी अधिवेशनसरकारकेंद्र सरकार