लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेतील दोन बँका बुडाल्याने आणि क्रेडिट सुईसची ढासळलेली स्थिती यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये बँकिंग संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, कच्च्या तेलाच्या किमती एका आठवड्यात १२ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून ब्रेंट क्रूड प्रतिबॅरल ८५ डॉलरवरून ७३ डॉलरवर घसरले आहे.
गेल्या १० महिन्यांपासून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, तर या काळात जागतिक बाजारात कच्चे तेल ४०% स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत लोकांना आता महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा मिळण्याची आशा आहे.
दिलासा मिळेल?
- यंदा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटकसह ७ राज्यांमध्ये निवडणुका आहेत.
- कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आहे. आगामी निवडणुका पाहता पेट्रोल आणि डिझेलवर दीर्घकाळानंतर दिलासा मिळू शकतो.
- तज्ज्ञांच्या मते, यावर्षी क्रूडचे दर प्रतिबॅरल ७०-७२ च्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ५ ते ७ रुपयांची घट होऊ शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"