मुंबई: आताच्या घडीला देशभरात इंधनाचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम महागाईवरही होत असून, यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा कर कपात करून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रापाठोपाठ महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने कर कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, तो प्रत्यक्षात येताना अद्यापही दिसत नाही. देशभरातील अन्य बड्या शहरांच्या तुलनेत मुंबई, महाराष्ट्रातील इंधन दर सर्वांत जास्त असल्याचे दिसत आहे. (Petrol-Diesel Price Maharashtra)
राज्य सरकारचा व्हॅट सर्वाधिक असल्याने मुंबई व महाराष्ट्रातपेट्रोल आणि डिझेल दर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाग आहेत. मुंबई व महाराष्ट्र वगळता देशात सर्वत्र पेट्रोल हे सरासरी १०९, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटरच्या खाली आहे. देशातील १४ प्रमुख शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईत पेट्रोल १११.३५, तर डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. सर्वांत स्वस्त पेट्रोल चंडीगड येथे असून, तेथे पेट्रोल ९७.२० रुपये प्रति लिटरने मिळते तर डिझेल ८४.२६ रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेल देशात सर्वांत महाग
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील २० राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशातील पेट्रोलचा सरासरी दर १०० रुपये किंवा त्याहून कमी आहे. १२ राज्यांमध्ये तो १०० ते ११० रुपयांदरम्यान आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरसरी दर १११ ते ११२ रुपये प्रतिलिटर आहे. हीच स्थिती डिझेलबाबत आहे. देशातील २० राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशातील डिझेलचा सरासरी दर ८० ते ९० रुपयांदरम्यान आहे. ११ राज्यांमध्ये हा दर ९० ते ९५ रुपये प्रतिलिटरदरम्यान आहे. राज्यात मात्र डिझेल सरासरी ९६ ते ९७ रुपये प्रतिलिटर आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क कपात केल्यावर पेट्रोल सुमारे ९ रुपये प्रतिलिटरने स्वस्त झाले. त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट सुमारे २.०४ रुपये कमी करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी झालेच नसल्याची स्थिती असताना आता मुंबई आणि महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेल देशात सर्वांत महाग असल्याचे वास्तव समोर आले आहे.
देशातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर किती आहेत?
देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर असून, डिझेलचा दर ८९.६२ रुपये आहे. तर, चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये प्रति लीटर असून, डिझेल ९४.२४ रुपये आहे. कोलकाता येथे पेट्रोलचा दर १०६.०३ असून, डिझेल ९२. ७६ रुपये आहे.