Join us  

कंगाल श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल अजूनही भारतापेक्षा स्वस्त; शोधणार तेलाचे साठे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 7:30 AM

ताज्या दरवाढीनंतर श्रीलंकेत ऑक्टेन ९२ पेट्रोलचा दर ४२० श्रीलंकाई रुपये (९०.५ भारतीय रुपये) लिटर, तर डिझेलचा दर ४०० श्रीलंकाई रुपये (८६ भारतीय रुपये) झाला.

कोलंबो : आर्थिक संकटात सापडून कंगाल झालेल्या श्रीलंकेत मंगळवारी पेट्रोलच्या दरात २४.३ टक्क्यांची, तर डिझेलच्या दरात ३८.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर गेले असले तरी भारताच्या तुलनेत ते अजूनही कमीच आहेत. 

ताज्या दरवाढीनंतर श्रीलंकेत ऑक्टेन ९२ पेट्रोलचा दर ४२० श्रीलंकाई रुपये (९०.५ भारतीय रुपये) लिटर, तर डिझेलचा दर ४०० श्रीलंकाई रुपये (८६ भारतीय रुपये)  झाला. हा श्रीलंकेतील इंधन दराचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. याआधी श्रीलंकेत १९ एप्रिलला इंधन दरवाढ करण्यात आली होती. भारतात पेट्रोलचा दर सुमारे ९७ रुपये लिटर आणि डिझेलचा दर सुमारे ९० रुपये लिटर आहे. केंद्र सरकारने अलीकडेच उत्पादन शुल्कात पेट्रोलवर ८ रुपयांची, तर डिझेलवर ६ रुपयांची कपात केली. त्यामुळे पेट्रोल ९.५० रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. श्रीलंका सरकारने मनारच्या खोऱ्यात तेल शोधण्याची योजना आखण्याचा विचार चालविला आहे. हा भाग लक्षद्विप सागराचा भाग असून येथे ५ लाख घन फूट नॅचरल गॅस आहे. २०११ मध्ये याचा शोध लागला होता. (वृत्तसंस्था)

भारताकडे मागितले ५० कोटी डॉलरचे कर्जदरम्यान, विदेशी चलनाची तीव्र टंचाई सहन करणाऱ्या श्रीलंकेने भारतीय एक्झिम बँकेकडे ५० कोटी डॉलरचे कर्ज मागितले आहे. हा पैसा श्रीलंकेल पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी हवा आहे. विदेशी चलन संपल्यामुळे तेल खरेदीचे बिले अदा करणे श्रीलंकेला अशक्य झाले आहे. श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कंचना विजेसेकेरा यांनी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय एक्झिम बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :श्रीलंकापेट्रोल