नवी दिल्ली : सामान्यांना महागाईने हैराण केले असतानाच सौदी अरामकोने अशियासाठी देण्यात येणाऱ्या क्रूड ग्रेडच्या दरात वाढ केली आहे. तसेच केंद्र सरकारनेही गेली ९० दिवस क्रूड ॲाइलचे दर प्रचंड वाढलेले असतानाही निवडणुकीमुळे दरवाढ रोखली आहे. यामुळे मार्चमध्ये निवडणूक निकाल जाहीर होताच पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका सामान्यांना बसणार असून, महागाईची झळ आणखी वाढणार आहे.सौदी अरामकोने आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ॲाइलच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ६० सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केली आहे. रॉयटर्सने जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये, किमतीतील ही वाढ आशियातील मजबूत मागणी दर्शविते असून, यामुळे कंपन्या गॅसोइल आणि जेट इंधनात जास्त फायदा कमावत असल्याचे दिसते, असे म्हटले आहे.सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उत्तर पाहायला मिळाला तर याचा थेट परिणाम भारतातील इंधनांच्या किमतीवर पडू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. २ डिसेंबर २०२१ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल झालेला नाही. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्यासह देशातील इतर राज्यांत पेट्रोलची १०० रुपयांहून अधिक दाराने विक्री होत आहे.
कच्चे तेल पोहोचले ९३ डॉलरवरआंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या किमती रविवारी ९३ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. युक्रेन रशिया तणावामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा थेट फटका भारताला बसणार असून, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार आहे.