Join us

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदीकडून आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:04 AM

Petrol-diesel prices : जुलैमध्ये आशियाई देशांना निर्यात होणाऱ्या अरब लाईट तेलाची अधिकृत किंमत जूनच्या तुलनेत प्रतिबॅरल २.१ डॉलरने वाढविण्यात आली आहे. ओमान आणि दुबईच्या तेलाच्या तुलनेत सौदीच्या तेलाचे दर आता ६.५ डॉलरनी अधिक झाले आहेत.

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाने जुलैसाठी आशियाई देशांना विकावयाच्या कच्च्या तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जवळपास दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल आणखी महागणार आहे.जुलैमध्ये आशियाई देशांना निर्यात होणाऱ्या अरब लाईट तेलाची अधिकृत किंमत जूनच्या तुलनेत प्रतिबॅरल २.१ डॉलरने वाढविण्यात आली आहे. ओमान आणि दुबईच्या तेलाच्या तुलनेत सौदीच्या तेलाचे दर आता ६.५ डॉलरनी अधिक झाले आहेत. बहुतांश बाजारांतील भाकितांत ही वाढ १.५ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ६ पैकी केवळ एका प्रतिसादकाने २ डॉलरच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त केला होता.एका आशियाई तेल व्यापाऱ्याने सांगितले की, अरब लाईटच्या किमतीतील वाढ अगदीच अनपेक्षित असून आम्ही चक्रावलो आहाेत. 

तेलाची टंचाई निर्माण होण्याची शक्यतासूत्रांनी सांगितले की, वाढीच्या मूळ वेळापत्रकात रशियालाही गृहीत धरण्यात आले होते. तसेच अँगोला आणि नायजेरिया यांसारखे देश आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन वाढ कमी होऊन तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते. अमेरिकेसह उत्तर गोलार्धातील बहुतांश देश जुलैमध्ये आपली उन्हाळी मालवाहतूक सुरू करतात. त्यातच सर्वात मोठा तेल आयातदार देश चीन हा आपल्या शांघाय व इतर शहरांतील कोविड-१९ लॉकडाऊन उठविणार आहे. या पार्श्वभूमीवर तेलाच्या मागणीत जुलैमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा लाभ सौदी अरेबिया उठवू पाहत आहे.

भारतीय वस्तूंच्या विक्रीवर काही देशांत बंदीविशिष्ट धर्मावरील भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेबद्दल कतार, कुवेत, इराण या देशांनी भारतीय राजदूतांनी बोलावून त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भाजप नेत्यांच्या टीकेबद्दल आखाती देशांनी संताप व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन व अन्य अरब देशांनी आपल्या सुपर स्टोअरमध्ये भारतीय उत्पादने विक्रीस ठेवण्यास मनाई केली आहे. 

पाकिस्तानची प्रतिक्रिया हास्यास्पद; भारताने खडसावलेज्या पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या हक्कांची सातत्याने गळचेपी होते, त्याच देशाने दुसऱ्या देशातील लोकांच्या हक्कांबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया हास्यास्पद आहे, अशी टीका भारताने केली. केंद्रीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, अहमदिया यांच्या हक्कांची गळचेपी होते हे साऱ्या जगाने पाहिले आहे. विशिष्ट धर्माबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून त्याच्याकडे निषेध व्यक्त केला होता. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल