नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत टॅक्स आणि डीलर्सच्या कमिशनशिवाय पेट्रोलचे दर केवळ ३४.०४ प्रति लिटर, तर डिझेलचे दर ३८.६७ रुपये प्रति लिटर असू शकतात. सरकारने लोकसभेत याची माहिती देताना सांगितले की, पेट्रोलमध्ये ९६.९ टक्के आणि डिझेलमध्ये ६०.३० टक्के हिस्सा टॅक्स आणि डीलर्स कमिशनचा असतो.सरकारने सांगितलेला दर केवळ दिल्लीतील असला तरी अन्य राज्यांमध्ये साधारणपणे याच दरामध्ये पेट्रोल व डिझेल मिळू शकते. कर व कमिशन यामुळेच त्यांच्या किमती ६७ ते ७६ रुपयांपर्यंत गेल्या आहेत.अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, १९ डिसेंबर रोजी पेट्रोलचे किरकोळ दर ७०.६३ रुपये प्रति लिटर होते.यात १७.९८ रुपये उत्पादन शुल्क, १५.०२ रुपये राज्यांचा व्हॅट आणि ३.५९ रुपये डीलर्स कमिशन यांचा समावेश आहे.तथापि, १९ डिसेंबर रोजी डिझेलची किरकोळ किंमत ६४.५४ रुपये प्रति लिटर होती. यात १३.८३ रुपये उत्पादन शुल्क, ९.५१ रुपये राज्यांचा व्हॅट आणि २.५३ रुपये डीलरचे कमिशन समाविष्टआहे.पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या रोज बदलतात. तसेच, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लागणाऱ्या व्हॅटच्या आधारे या किमती ठरतात.केंद्राने मिळवले सव्वादोन लाख कोटीशिवप्रताप शुक्ला यांनी सांगितले की, केंद्राने गेल्या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्काच्या माध्यमातून पेट्रोलवर ७३,५१८.८ कोटी रुपये आणि डिझेलवर १.५० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला.चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २५,३१८.१० रुपये आणि डिझेलवर ४६,५४८.८ कोटी रुपये करातून जमा झाले, तसेच ४ आॅक्टोबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे केंद्र सरकारला ७००० कोटी रुपयांचा तोटा झाला.
कर आणि कमिशनशिवाय पेट्रोल ३४ रुपयांत, सरकारची लोकसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:27 AM