Join us

Petrol Hike: निवडणुकीनंतर हळू-हळू वाढवलं पेट्रोल, मुंबईत 120 रु. लिटर तर डिझेलही महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 8:12 AM

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली

मुंबई - महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाही. विशेष म्हणजे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच, आज पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या दरवाढीतून पेट्रोलच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. नवीन दरवाढीनुसार पेट्रोल आणि डिझलेच्या किंमती राजधानी दिल्लीत १०४.६१ आणि ९५.८७ रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११९.६७ आणि डिझेल १०३.९२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 आठवड्यात इंधनाची दरवाढ तब्बल 9 ते 10 रुपयांनी झाली आहे. त्यामुळे, महागाईला आटोक्यात आणण्यास सरकार सपशेल अपयशी ठरत आहे. निवडणूक काळात तब्बल 2 ते 3 महिने पेट्रोलच्या दरात काहीही बदल झाला नाही. दरवाढ कुठेही दिसली नाही. मात्र, निवडणुकांचे निकाल हाती येताच, 25 दिवसांत 10 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत.  दरम्यान, महाराष्ट्रात परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोलचे दर सर्वेाच्च आहेत. सोमवारी येथे पेट्रोल १२१.२३ रुपये, तर डिझेल १०१.४२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. सुमारे साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्चपासून त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. गेल्या १४ दिवसांपैकी १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

पेट्रोल दरवाढीवरुन सर्वसामान्यांसह बड्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींना अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचं स्वामींनी ट्विट करुन म्हटलं आहे.   

टॅग्स :नरेंद्र मोदीपेट्रोलडिझेलसरकार