बंगळुरू : देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक पेट्रोलपंपांवर सोमवारपासून २० टक्के इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू झाली आहे. उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैव-इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, सरकार इथेनॉलचे पेट्रोलमध्ये वापरण्याची प्रक्रिया वेगवान करत आहे.
सध्या पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळले जाते आणि २०२५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचा सरकारचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऊर्जा सप्ताह-२०२३ मध्ये दोन महिने अगोदर २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सादर केले. यापूर्वी एप्रिलमध्ये २० टक्के इथेनॉलसह पेट्रोल आणण्याची योजना होती.
१५ शहरांत ‘ई-२०’ पेट्रोल
मोदी म्हणाले, ‘ आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २०१४ मधील १.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. आता आम्ही २० टक्क्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहोत. पहिल्या टप्प्यात १५ शहरांमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल लॉन्च केले जाईल. येत्या दोन वर्षांत ते देशभरात सादर केले जाईल.
वाचले ५३,८९४ कोटी
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळल्याने देशाचे ५३ हजार ८९४ कोटी रुपयांचे परकीय चलन वाचते. त्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळत आहे. ई-२० (२० टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल) ११ राज्य / केंद्रशासित प्रदेशातील तीन पीएसयू पेट्रोलपंपांवर उपलब्ध आहे.