पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. प्रतिलिटर पेट्रोलचा दर १०५ ते ११० रुपयांपर्यंत पोहचला आहे. परंतु आखाती देशांकडून क्रूड ऑयलचं उत्पादन वाढल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होतील अशी अपेक्षा लागून राहिली आहे.
येणाऱ्या काळात पेट्रोलच्या किंमती ५ रुपये प्रतिलिटर कमी होऊ शकतात. स्वस्त कच्च्या तेलाचा फायदा भारताला होऊ शकतो असं तज्ज्ञांना वाटतं. आयआयएफएल सिक्युरिटिजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, क्रूड ऑईलचं उत्पादन वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती ६५ डॉलर प्रति बॅरल कमी होऊ शकतात. जर असं झालं तर त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पेट्रोल ४ ते ५ रुपये प्रतिलिटर कमी होईल. परंतु हा फायदा ऑयल मार्केटिंग कंपन्या सर्वसामान्यांना देणार की नाही? हे पाहावं लागेल असं त्यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलची मागणी वाढली
जुलैच्या पंधरवड्यात भारतात पेट्रोलची विक्री २०२० च्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच विक्रमी झाली. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. व्यवसायाला चालना मिळाली आणि ट्रॅव्हल बॅन हटवल्यानंतर पेट्रोलच्या दरात वाढ झाली. सरकारी तेल कंपन्या प्रोविजनल डेटानुसार, जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २०१९ च्या तुलनेने ३४ टक्के पेट्रोलची विक्री झाली.
मागील वर्षी याच काळात पेट्रोल विक्री १८ टक्क्यापेक्षा जास्त होती. मासिक तुलनेत जूनमध्ये पेट्रोल विक्रीपेक्षा जुलैमध्ये १४ टक्के वाढ झाली. परंतु २०१९ च्या तुलनेत डिझेलच्या विक्रीत ११ टक्के तुटवडा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिझेल विक्रीत १३ टक्क्यांनी वाढ झाली होती. पावसामुळे शेती आणि बांधकाम क्षेत्रातील मागणी कमी झाल्याने डिझेलची विक्री कमी झाली.