मुंबई: कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. (petrol price hike 20 paise and diesel hike 25 paise know the today latest fuel rate in india)
पेट्रोलियम कंपन्यांनी गेले सलग तीन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव ११० रुपयावर गेला होता. शुक्रवारी पेट्रोल दरात २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ करण्यात आली. तर आता आज शनिवारी पेट्रोल दर २० पैसे आणि डिझेल दर २५ पैशांनी वाढवण्यात आला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर किती?
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०८.१५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.१४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.७६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.७४ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.५९ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.६५ रुपये झाले आहे.
भोपाळमध्ये डिझेल सर्वोच्च स्तरावर
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९८.१२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९०.४८ रुपये आहे. चेन्नईत ९४.९९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.५४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९९.३७ रुपये असून, बंगळुरात डिझेल ९५.९८ रुपये आहे.
दरम्यान, युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत.